मिरज पूर्वभागातील बेळंकी, लिंगनूर, खटाव, आरग येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत असल्याने परिसरात कडब्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. यावर्षी रबी पिकाचे क्षेत्र वाढले असले तरी शाळू पिकाचे क्षेत्र घटले आहे. उसाची लागवड भरपूर झाल्याने शाळू व इतर पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जनावरे आहेत त्यांनी कडबा खरेदी करून ठेवत असल्याने कडब्याला मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांनी गेली चार महिने उसाचे वाढे चारुन जनावरे जगवली आहेत, पण आता या भागातील ऊसतोड संपल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या काही भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे, पण आता लगेच चारा उपलब्ध होणार नाही. नवीन चारा यायला अजून चार ते पाच महिने वेळ लागणार असल्याने शेतकरी जनावरांना चारा मिळवण्याच्या शोधात आहेत. सध्या कडब्याचा दर शेकडा पंधराशे ते दोन हजार रुपये झाला आहे. मात्र, मदभावी जमखंडी, अथणी या कर्नाटकातील सीमाभागात शेकडा एक हजार ते पंधराशे रुपयात कडबा मिळत असल्याने कर्नाटकमधील कडब्यास शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.
फोटो : १० लिंगनुर १
ओळ : दूध उत्पादक शेतकरी वर्षभर पुरेल इतका कडबा साठवून ठेवत आहेत.