सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला प्रतिक्विंटल १७ हजार ते सात हजार ६०० रुपये दर मिळाला. सरासरी १२ हजार ३०० रुपये दर मिळाला आहे.
सांगली मार्केट यार्डात नवीन हळदीची आवक जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे. परंतु मार्च महिन्यात हळदीची आवक वाढली आहे. जगभरात हळदीला मागणी वाढल्यामुळे ७० वर्षांत हळदीला उच्चांकी दर मिळत आहे. गेल्या आठवड्यात निवडक अत्यंत चांगल्या दर्जाच्या राजापुरी हळदीला प्रतिक्विंटल ४१ हजारांपर्यंत दर मिळाला आहे. एप्रिल २०२० ते १२ मार्च २०२१ या कालावधीत सांगली मार्केट यार्डात ८ लाख ७९ हजार ४०७ क्विंटल हळदीची आवक झाली होती. दरवर्षीच्या तुलनेत हळदीची आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. एका दिवसात १८ हजार ९१८ क्विंटल हळदीची आवक झाली होती. हलक्या प्रतीच्या हळदीला ७ हजार ६००, तर चांगला प्रतीच्या हळदीला १७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. पुढील आठवड्यात पुन्हा दरात वाढ होण्याची शक्यता हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.