लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याचे मैदान काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. निवडणूक जाहीर होण्याअगोदरच तिन्ही पॅनलचे नेते आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा एकमेकांवर डागत आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कारखान्याला खासगीकरणापासून रोखण्याचे आवाहन करत विरोधकांच्या पॅनलचे सोशल मीडियावरून वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे.
‘कृष्णा’च्या दोन निवडणुकांतील १३ हजार ५२८ खुल्या सभासदांचा मुद्दा डॉ. मोहिते यांनी पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सत्ताधारी सहकाराचे नेते सभासद रद्द करणे, सक्तीने राजीनामा घेणे, मताचा हक्क हिरावून घेणे, अक्रियाशील सभासद म्हणून नोंद करणे आदी कारस्थाने करून सहकारी तत्त्वावर चाललेला साखर कारखाना खासगीकरण करण्याचा डाव आपण उधळून टाकूया, यासाठी आगामी निवडणुकीला सभासदांनी रयत पॅनलच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन सोशल मीडियावरून डॉ. मोहिते यांनी केले आहे.
डॉ. मोहिते यांनी स्पष्ट केले आहे की, तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांच्या सूचनेप्रमाणे सहकार चळवळीची तत्त्वे विचारात घेऊन पात्र असलेल्या प्रत्येकाला मालकी हक्क मिळावा म्हणून खुले सभासदत्व दिले होते. या सभासदांना १९९२-९३ पासून विविध ठराव करून कारखान्याचे मालक म्हणून अधिकार दिले होते; परंतु त्या विरोधात न्यायालयीन अडचणी आल्या. यामध्ये न्यायालयानेही या सभासदांना न्याय दिला, परंतु त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला. योगायोगाने २००५ मध्ये पुन्हा ‘रयत’ची सत्ता आली. त्यामुळे या सभासदांना १४ वर्षांनंतर न्याय दिला. आता या सभासदांना पुन्हा अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सहकार चळवळ खासगीकरणाकडे निघाली. याला पायबंद घालण्यासाठी पुन्हा एकदा कारखाना आमच्या ताब्यात द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
फोटो : डॉ. इंद्रजित मोहिते (सिंगल फोटो)