उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी दबाव

By admin | Published: December 20, 2015 11:04 PM2015-12-20T23:04:23+5:302015-12-21T00:49:10+5:30

राजीनाम्याची शक्यता : तासगावात काका गटाच्या नगरसेवकांची मोर्चेबांधणी

Pressure for resignation of Deputy Chief Minister | उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी दबाव

उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी दबाव

Next

दत्ता पाटील -- तासगावनगरपालिकेतील भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष नकोत, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी काका गटाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांच्या राजीनाम्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा संघर्ष आहे. मात्र पालिकेच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष अद्यापही एकत्र आहेत. याबाबत ‘लोकमत’मधून तासगावात भाजपचा राष्ट्रवादीशी घरोबा कायम या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांत कुजबूज सुरू झाली. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांपर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्या. पालिकेत राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आबा गटाचे अधिकृत संख्याबळ चार आहे. त्यातही पुन्हा दोन गट आहेत. त्यामुळे भाजपचे एकहाती वर्चस्व असतानादेखील राष्ट्रवादीकडे उपनगराध्यक्षपद असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष भाजपचाच हवा, अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांची उचलबांगडी करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.उपनगराध्यक्ष सुरेश थोरात आबा गटाचे असले तरी सद्यस्थितीत त्यांचे पद भाजपच्या पुण्याईवरच कायम राहिल्याचे चित्र आहे. पालिकेत सद्यस्थितीत भाजपचे संख्याबळ भक्कम आहे, तर थोरात यांच्या पाठीशी केवळ दोन नगरसेवकच उभे राहतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपकडून राजीनाम्याची मागणी झाल्यामुळे थोरात उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपच्या काही नगरसेवकांकडूनही तशी शक्यता व्यक्त होत आहे.


उपनगराध्यक्षपद भाजपकडे असावे, अशी आमच्या पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत दोन दिवसांत नगरसेवकांची पक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व नगरसेवकांच्या भावना विचारात घेऊन, नगरसेवकांची निर्णय खासदार संजयकाका पाटील यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल. त्यानंतर खासदार संजयकाकांच्या आदेशानुसारच उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
- अनिल कुत्ते, पक्षप्रतोद,
तासगाव नगरपालिका.


उपनगराध्यक्षपदाच्या बदल्यात सभापतीपद
तासगाव पालिकेत भाजपचे कमळ फुलविण्यात राष्ट्रवादीच्या सुरेश थोरात, सुशिला साळुंखे आणि अनुराधा पाटील या तीन नगसेवकांची महत्त्वाची कामगिरी बजावली होती. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांचा आदेश झुगारुन तीनही नगरसेवकांनी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक संजय पवार यांच्या उचलबांगडीसाठी पुढाकार घेतला होता. आता भाजपमध्ये उपनगराध्यक्षपद ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षपद काढून घेतले तरी मदतीच्या मोबदल्यात एखादे पद त्यांच्याकडे असावे, यासाठी अनुराधा पाटील यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद दिल्याची चर्चा आहे.

Web Title: Pressure for resignation of Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.