सांगली : महापालिका प्रशासनाने जागतिक बँकेच्या पथकासमोर शनिवारी पूरनियंत्रण तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाचशे कोटींच्या प्रकल्प उपाययोजनांचे सादरीकरण केले. शेरीनाल्यावर गेट उभारणे, प्रमुख नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व काँक्रीट बांधकाम, शामरावनगरातील पाणी नाल्याद्वारे बाहेर काढणे आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.याबाबतचा सुधारित प्रस्ताव दोन आठवड्यांत जागतिक बँकेला सादर करण्यात येणार आहे.जागतिक बँकेच्या पथकातील जोलंटा, टीजार्क, अनुप कारंथ, शिना यांनी महापालिकेत शनिवारी बैठक घेतली. स्थायी समिती सभागृहात शनिवारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी पथकासमोर प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, पाणीपुरवठा विभागाचे सुनील पाटील, स्वच्छता विभागाचे अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, प्रायमो कन्सल्टंट कंपनीचे अभियंते, अधिकारी उपस्थित होते.
प्रायमो कंपनीने महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण करून ४६८ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. यामध्ये आणखी ३२ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश केला आहे. त्यानुसार पाचशे कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण जागतिक बँकेच्या पथकासमोर करण्यात आले. पूरनियंत्रणाबरोबर पुराचे व पावसाचे साचून राहणारे पाणी तत्काळ निचरा होण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महापालिकेला निधी उपलब्ध होणार आहे.
जागतिक बँकेच्या पथकासमोर सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये शामरावनगर परिसरातील कालिकानगरमधील पावसाचे साचून राहणारे पाणी हरिपूर नाल्यात सोडणे. कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार बांधणे. शामरावनगर, गंगोत्रीनगरमध्ये साचणारे पाणी अंकली नाल्यात सोडणे या कामांचा समावेश केला आहे.तसेच शेरीनाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण करून तीन किलोमीटर लांबीचा काँक्रीटचा नाला बांधणे. पुराचे पाणी शेरीनाल्यातून शहरात पसरू नये यासाठी गेट उभारणे. मिरजेतील मालगाव रस्ता, वड्डी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, नागरी वसाहतीजवळील नाला काँक्रीटचा बांधणे या महत्त्वाच्या प्रकल्पांसह अन्य उपाययोजनांचे सादरीकरण पथकासमोर केले.
सुधारित आराखडाजागतिक बँकेच्या पथकासमोर विविध प्रकल्पांचे सादरीकरण केल्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या. महापूर तसेच पावसाचे पाणी याचा सखोल अभ्यास करावा. काहीवेळेला अचानक जादा पाऊस झाल्यास साचणारे पाणी वाहून जाण्याची क्षमता असणारे मुख्य नाल्यांचे बांधकाम असावे. प्रकल्प आराखड्यात त्याचा उल्लेख करून सुधारित आराखडा सादर करावा सुचवले. पथकाने केलेल्या सूचना आणि नवीन काही कामांचा समावेश करून सुधारित पाचशे कोटींचा प्रकल्प आराखडा जागतिक बँकेला सादर करण्यात येणार आहे.
दोन आठवड्यांत सुधारित आराखडामहापालिका आयुक्त गुप्ता म्हणाले, महापालिका क्षेत्रातील पूरनियंत्रण तसेच पावसाचे पाण्याचा निचरा करण्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा सुधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल. दोन आठवड्यांत तो जागतिक बँकेकडे सादर होईल. मार्चअखेर निविदा प्रक्रिया होऊन वर्क ऑर्डर मिळेल.
दुसरा प्रस्तावही लवकरचमहापालिका क्षेत्रात ७३ ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते, असे दिसून येते. या पाण्याचा निचरा तातडीने करण्याची मागणी होते. त्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा दुसरा प्रकल्प आराखडा तयार केला जाईल.