फोटो ओळ : मराठा आरक्षणाची भूमिका विधीमंडळात मांडावी, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडने आमदार विक्रम सावंत यांना दिले. यावेळी श्रेयश नाईक, रोहित चव्हाण, विजयकुमार नाईक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी मराठा समाजातील नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्या नियुक्त्या तत्काळ द्याव्यात, जत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १४ वर्षे रखडलेल्या पुतळ्याचे काम त्वरित करावे, मराठा आरक्षणाची भूमिका विधीमंडळात मांडावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडने आमदार विक्रम सावंत यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे, संभाजी ब्रिगेड मराठा ओबीसीकरणाचा लढा गेल्या तीस वर्षांपासून लढत आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण व संरक्षण द्यावे, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरीसाठी पात्र ठरलेल्या मराठा समाजातील दोन हजार १८५ उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, त्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तत्काळ माफ करावे, सर्व समाजघटकांची जातनिहाय जनगणना करावी, अशा मागण्या केल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची मोठी अपेक्षा आहे. मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळ अधिवेशनात आपण भूमिका मांडली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने निवेदनातून दिला आहे.
यावेळी श्रेयश नाईक, रोहित चव्हाण, विजयकुमार नाईक, दीपक पाटणकर, प्रमोद काटे, खंडू शिंदे, संदीप नाईक, मल्लिकार्जुन कोळी, इर्शाद तांबोळी, वैभव पवार, आकाश कदम, युवराज कोडग, आदी उपस्थित होते.