लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची कॉंग्रेसची तयारी आहे. स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून व प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ, असे प्रतिपादन कृषिराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.
आमदार विक्रम सावंत यांनी मोहनराव कदम यांच्याकडून मंगळवारी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, जितेश कदम, जयश्री पाटील, मालन मोहिते यांच्यासह विविध तालुक्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले की, जिल्ह्यात पक्षसंघटन बळकट करणार आहोत. गणेशोत्सवानंतर प्रत्येक तालुक्यात दौरा करू. तळागाळातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल. सहकारी मित्रपक्षात सध्या पक्षप्रवेश सुरू असले तरी सोडून गेलेले कार्यकर्तेच परतत आहेत. त्याला हरकतीचे कारण नसावे. कॉंग्रेसच्या कोणाही मूळच्या कार्यकर्त्याने पक्ष सोडलेला नाही.
ते म्हणाले, पूरग्रस्तांसाठी शासनाने ११ हजार कोटींचे पॅकेंज देऊ केले आहे. सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल. केंद्राकडून राज्याला जीएसटीच्या परताव्यापोटी २९ हजार कोटी रुपये येणे आहेत. ते मिळाल्यास विकासकामे गतीने होतील.
कार्यकर्ता बैठकीत ते म्हणाले की, पक्षाचा विचार टिकविण्यासाठी व जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले पाहिजे, हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. मोहनराव कदम यांनी नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करूनच अध्यक्षबदलाचा निर्णय घेतला. अनुभवी अध्यक्ष देण्याचा निर्णय घेतला. सर्व कार्यकर्त्यांचे ऐकूनच निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षावर इतर पक्षांचे आक्रमण होऊ देणार नाही. पक्षांतराकडे फार लक्ष देऊ नका.
मोहनराव कदम म्हणाले, वारे बदलले असून पक्षाला चांगले दिवस आहेत. कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. विक्रम सावंत म्हणाले, पक्षाने दुष्काळी तालुक्यावर जबाबदारी सोपविली आहे. मोहनराव कदम यांच्या वाटेवरूनच काम करू.
चौकट
विशाल पाटील यांच्या नाराजीची माहिती नाही
डॉ. कदम म्हणाले की, विशाल पाटील नाराज असल्याची माहिती पत्रकारांकडूनच समजली. त्यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद स्वीकारले आहे. आभारही मानले आहेत. त्यामुळे नाराजीचे कारण नसावे. आमदार विक्रम सावंत यांनीही त्यांच्याशी संपर्क केला आहे.