माधवनगर : पंधरा लाखांच्या वीज बिल थकबाकीपैकी १२ लाख रुपये तातडीने भरण्याची तयारी माधवनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील गावांनी दर्शविल्यानंतर महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. यामुळे उद्या (बुधवार)पासून या सातही गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयात आज (मंगळवार) सातही ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत प्रचंड वादावादीनंतर हा निर्णय घेण्यात आला. थकबाकीमुळे महावितरणने दि. १३ नोव्हेंबरपासून वीज पुरवठा खंडित केल्याने माधवनगरसह सात गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. माधवनगर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी शंभर टक्के भरूनही इतर गावांच्या थकबाकीमुळे माधवनगरचा पाणीपुरवठा बंद झाला होता. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता. सातही गावांतील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर प्रयत्न करून पंधरा लाखांपैकी बारा लाख रुपये जमा केले. आज ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तमालिकेची दखल घेत मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांनी सातही गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठा शिखर समितीच्या सदस्यांची आज बैठक घेतली. बैठकीत वाघमोडे यांच्यासमोर सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. वाघमोडे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना, आजच महावितरण कार्यालयात थकबाकी भरा, अशी सूचना केली. त्यानंतर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयात पोहोचले. अधीक्षक अभियंता एम. जी. शिंदे यांना बारा लाख रुपयांचा धनादेश देत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शिंदे यांनी, संपूर्ण थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करता येणार नाही असे सुनावले. यामुळे पदाधिकारी व त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. शेवटी बारा लाख रुपयांचा धनादेश महावितरणच्या खात्यावर बुधवारी आॅनलाईन भरावा व उर्वरित रक्कम काही दिवसातच भरण्याची लेखी हमी द्यावी, असा प्रस्ताव शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांपुढे मांडला. त्यानुसार उद्या, बुधवार बारा लाख रुपये जमा झाल्यानंतर दुपारनंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिखर समितीचे प्रशांत मोहिते, गोविंद परांजपे, शब्बीर मुल्ला, सुरेश पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र शिवकाळे, पिंटू डुबल, राजकुमार घाडगे, सचिन पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
खंडित पाणीप्रश्नी बैठकीत वादावादी वीज बिल भरण्याची तयारी :
By admin | Updated: November 18, 2014 23:24 IST