लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाचे पार्थिव देण्यास नकार देत मृताच्या नातेवाईकांना दमदाटी केल्याप्रकरणी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली. त्याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विश्वजित सुरेश गिरीगोसावी (वय ३४, मूळ रा. विसापूर-तासगाव, सध्या इस्लामपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यातील इतर चौघांना मुंबई उच्च न्यायालयाने १४ जुलैपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. यातील संशयितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथील काशीनाथ शंकर कांबळे (वय ६६) यांना कोविड उपचारासाठी २ मे रोजी प्रकाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी व्हेंटिलेटर आणि औषधांचा खर्च म्हणून ३ लाख ५० हजार रुपये घेतले होते. उपचार सुरू असताना १८ मे राेजी कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आणखी २ लाख १४ हजार रुपयांची मागणी करत नातेवाईकांना दमदाटी केली. पार्थिव ताब्यात देण्यास नकार देत विटंबना केली. तसेच फसवणूक केली, अशी फिर्याद मृताच्या नातेवाईकाने दिली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना कर्मचारी विश्वजित गिरीगोसावी याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. येथील न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले. सरकारी वकील रणजीत पाटील यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने गिरीगोसावी याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली.