सांगलीत प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धान्य आयातीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात थाळ्या वाजवून आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : धान्याच्या आयातीच्या निर्णयाविरोधात प्रहार पक्षातर्फे स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच तूर, मूग, उडीद या धान्यांच्या आयातीला परवानगी दिलेली आहे. भारतात ही धान्ये उपलब्ध असतानादेखील आयातीला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली. महापालिका क्षेत्र अध्यक्ष मुनीर मुल्ला म्हणाले, देशात तुरीची ४२ लाख टनांची आवश्यकता असताना सध्या ४५ लाख टन उपलब्धता आहे, म्हणजेच आवश्यकतेपेक्षा दोन लाख टन जास्त उपलब्धता आहे. तरीही केंद्र सरकारने ६ लाख टनांच्या आयातीला परवानगी दिली आहे. भविष्यात देशांतर्गत तूर, मूग, उडीद या धान्यांच्या किमतीत आयातीमुळे प्रचंड घसरण होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आयात त्वरित थांबवावी.
कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकात थाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनात जिल्हा युवक अध्यक्ष ओम भोसले, शहर युवक अध्यक्ष अमित पवार आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला.