संख : जुन्या झालेल्या विद्युत वाहिन्या, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जादा भारनियमन यामुळे भिवर्गी (ता.जत) येथे अनियमित व कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. सध्या दिवसातून चारच तास वीजपुरवठा सुरू आहे. त्यातही चार-पाच वेळा वीज खंडित होते. याचा परिणाम पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर व शेती व्यवसायावर होत आहे.
कृषी पंप जळण्याचे प्रमाण अधिक आहे.
पाणी असूनही ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्याअभावी द्राक्ष, डाळिंब फळबागा व ऊस पीक सुकू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
पूर्व भागातील संख येथील ३३के.व्ही विद्युत विभागांतर्गत केंद्रातून भिवर्गी गावाला वीजपुरवठा आहे. वीज वितरण कंपनीकडून नियमानुसार ८ तासांचे भारनियमन आहे; पण भिवर्गीत दिवसातून ४ तास वीजपुरवठा केला जात आहे.
गावाला पाणी पुरवठा साठवण तलावातून नळपाणी पुरवठा योजनेतून केला जातो. विहिरीला पाणी आहे; परंतु योजनेला खंडित वीज पुरवठ्याचा फटका बसला आहे. तलावापासून गावापर्यंतच्या पाईपलाईन भरेपर्यंत दोन-तीन वेळा वीज
खंडित होते.
द्राक्षाची खरड छाटणी झाली आहे. काड्या तयार करण्यासाठी पाण्याची गरज आहे. डाळिंब बागेचा भर धरला आहे; पण वीजपुरवठा चार तासांचा असल्याने पाणी पूर्ण क्षमतेने देता येत नाही.
अपुरा व वारंवार खंडित वीजपुरवठा होत आहे. याचा शेती, पिण्याच्या पाणीपुरवठा वर परिणाम होत आहे. या समस्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी उपसरपंच बसगोंडा चौगुले यांनी केली आहे.