कवठेमहांकाळ : खवल्याच्या कोट्यवधी पावल्या पचवण्यासाठी तालुक्यातील कुकटोळी येथील जुन्या पन्हाळ्यावर वनविभागाचे अधिकारी, या भागातील एक राजकीय नेता आणि काही दलालांची गुप्तगू झाल्याची जोरदार चर्चा या परिसरात रंगली आहे. याबाबत वरिष्ठ वन अधिकारी गांधारीची भूमिका घेत असल्याचाही आरोप नागरिकांतून होत आहे.
याबाबत एकाने नाव न सांगण्याच्या आटीवर माहिती दिली आहे. कुकटोळी येथील कारंडे वस्तीवर १५ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खवले मांजर आढळले होते. ते शुभम कारंडे यांच्या पोल्ट्रीत शिरले. यावेळी या पोल्ट्रीला कुलूप लावून, खवले मांजर कोंडण्यात आले व वनविभाला माहिती दिली; परंतु या भागातील रेंजर शिंदे या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी कर्मचारी पाठवून दिले. हे कर्मचारी रात्री साडेअकराला आले व खवले मांजर न घेताच निघून गेले.
१६ तारखेला सकाळी खवले मांजर त्या ठिकाणाहून गायब होते. त्याठिकाणी रक्ताचे डाग व पोल्ट्रीचा मागचा तारेचा भाग कट केला होता. त्यामुळे या खवल्या मांजराची तस्करी झाल्याचा संशय होता. वनविभागाने रात्रीच हे मांजर का नेले नाही, असेही लोक बोलत होते.
या प्रकरणाला आता एक महिना होत आला आहे. सगळे शांत झाले आहे असे वाटत असताना कुकटोळी येथील जुन्या पन्हाळ्यावर वनविभागाचे दोन अधिकारी या भागातील एक राजकीय नेता आणि चार ते पाच जण हे प्रकरण मिटवण्यासाठी पठारावर बसले होते. यामध्ये खवल्या मांजराची विक्री, खरेदी आणि व्यवहाराची चर्चा झाल्याची खात्रीशीर माहिती एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
चौकट
तस्करीची शक्यता
खवल्या मांजर हे दुर्मीळ असून त्याची चीन आणि व्हिएतनाममध्ये तस्करी केली जाते. त्याच्यापासून दमा आणि संधिवातावर औषध तयार केले जाते. या मांजराच्या तस्करीपासून कोट्यवधी रुपये मिळतात. त्यामुळे कुकटोळी येथील खवल्या मांजर गेले नसून त्याची तस्करी झाल्याचा अंदाज नागरिक व्यक्त करत आहेत.