सांगली/तासगाव : गेले पंधरा दिवस ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. एकूण ६०० जागांसाठी ही निवडणूक होत असून प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी मतदान होणार आहे तर ३ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गावा गावातील राजकीय घडामोडी चांगल्याच रंगल्याचे दिसून आले. सायंकाळी उशिरापर्यंत निवडणूक कर्मचारी व मतदानाचे साहित्य केंद्रावर पाठविण्याचे काम सुरू होते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या ५४ सार्वत्रिक व २४ ग्रामपंचायतीतील ६५ रिक्त जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे.या निवडणूकीत तासगाव तालुक्यातील सर्वाधिक ३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायती, खानापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी पोट निवडणूक होत आहे. यात चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तासगाव तालुक्यातील ३९ पैकी तीन ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी दिवसभर मतदान साहित्यासह कर्मचारी ज्या त्या गावात पोहोच करण्यासाठी तहसील कार्यालयात लगबग सुरु होती. जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतीतील ६०० जागांसाठी एकूण ३३६ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून, यात तासगावमध्ये १९५ केंद्र, पलूसमध्ये ९० केंद्र, जतमध्ये १९ , खानापूरमध्ये २० तर कवठेमहांकाळ तालुक्यात ६ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी एकूण १६८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, बाराशेवर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तासगाव तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शनिवारी संवेदनशील गावांत अधिकारी व पोलिसांनी संचलन केले. तालुक्यातील ३९ पैकी ३ गावे बिनविरोध झाली आहेत. उर्वरीत ३६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. एकूण ३५८ जागांसाठी ८३३ उमेदवार रिंगणात आहेत. १३६ वॉर्डसाठी १६२ मतदान केंद्रे आहेत. शनिवारी सर्व अधिकारी आणि कर्मचारी नेमणूक केलेल्या गावांत मतदान यंत्रासह आवश्यक सामग्रभ घेऊन हजर झाले. तालुक्यातील येळावी, सावळज, विसापूर, बोरगाव, मांजर्डे, हातनूर आणि कवठेएकंद ही गावे संवेदनशील घोषीत करण्यात आलेली आहे. या गावांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष पोलिस पथके तैनात आहेत. संवेदनशील गावांत तहसीलदार सुधाकर भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, पोलीस निरीक्षक जितेंंद्र शहाणे यांच्यासह पथकांनी संचलन केले. (प्रतिनिंधी) छुप्या हालचाली : कार्यकर्त्यांची धावपळ शुक्रवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी शनिवारी दिवसभर छुपा प्रचार सुरु होता. गावचा कारभारी ठरवणाऱ्या या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. दरम्यान, मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींचे आज मतदान
By admin | Updated: October 31, 2015 23:59 IST