सांगली : गेल्या महिन्यांपासून ‘धूम’ टोळीने शहरात धुमाकूळ घालून बँकेतून रोकड काढून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना लुटण्याचा उद्योग सुरु केल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दररोज नाकाबंदी सुरु आहे. शहरातील काही प्रमुख बँकांबाहेर नाकाबंदी करुन संशयित वाहनधारकांची धरपकड केली जात आहे. गेल्या आठ दिवसात सुमारे ९४८ दुचाकींवर कारवाई करुन एक लाख दोन हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.पुष्पराज चौक, जिल्हा परिषद, कर्नाळ पोलीस चौकी या तीन ठिकाणी बँकेतून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना ‘धूम’ टोळीने लुटले. भरदिवसा या घटना घडल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. या घटना रोखण्यासाठी व टोळीतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शहरातील गस्त वाढविली. पुष्पराज चौक, आमराई रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी मार्ग यासह शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नाकाबंदी केली जात आहे.‘धूम’ टोळी चार ते पाच जणांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते ग्राहकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांना लुटत आहेत. आतापर्यंत त्यांनी १३ लाखांची रक्कम लुटली आहे. घटनेनंतर ते दुचाकीवरुन पसार होतात. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी गुन्ह्याचे तंत्र बदलले असले तरी, ही टोळी एकच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नाकाबंदीत विशेषत: दुचाकी अडवून चौकशी केली जात आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसेल, तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शस्त्रधारी पोलिसांचा पहारा तैनात केला आहे. (प्रतिनिधी)धागेदोरे हाती : सावंतपोलीसप्रमुख सावंत म्हणाले, ‘धूम’ टोळी बाहेरील जिल्ह्यातील आहे. त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये निश्चित यश येईल. महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. बँका व ग्राहकांनीही सतर्कता बाळगायला हवी.
पोलीस ‘अलर्ट’; ‘धूम’ टोळी गायब!
By admin | Updated: November 28, 2014 23:49 IST