मिरज : फटाक्यांच्या स्फोटाच्या घटनेमुळे कवठेएकंद येथील ऐतिहासिक आतषबाजीवर निर्बंध येणार आहेत. गतवर्षीच्या स्फोटाच्या घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीत कवठेएकंद गावात आतषबाजी बंदीची शिफारस करण्यात आली आहे. गुरुवारी पोलीस व प्रशासनाच्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी आतषबाजीबाबत निर्णय घेणार आहेत. कवठेएकंद येथे दसऱ्याला आतषबाजीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. प्रतिवर्षी गावातील प्रमुख चौकात दसऱ्याला होणारी आतषबाजी पाहण्यासाठी जिल्ह्यातून गर्दी होते. दसऱ्याच्या आतषबाजीमुळे कवठेएकंदची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कवठेएकंद गावात आतषबाजीवेळी दुर्घटना घडल्याने ज्ीावित व वित्तहानी झाली आहे. गतवर्षी इगल फायर वर्क्स या फटाके कारखान्यात फटाक्यांच्या स्फोटात सातजणांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तत्कालीन प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यामार्फत स्फोटाच्या घटनेची दंडाधिकारीय चौकशी करण्यात आली. गावात विनापरवाना फटाके निर्मिती सुरू असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर फटाके उत्पादनास प्रतिबंध करण्यात आला. स्फोट होऊन दुर्घटना घडलेल्या इगल फायर वर्क्स या कारखान्याचा परवाना रद्द केला. गावाबाहेर परवानगीची शक्यताकवठेएकंद येथील ऐतिहासिक आतषबाजी बंद करण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने गावापासून काही किलोमीटर अंतरावर मोठ्या क्षमतेचे औट वगळता कमी क्षमतेच्या फटाक्यांच्या आतषबाजीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर सुरक्षित मैदानाची पाहणी करून जिल्हा प्रशासनाकडून आतषबाजीस परवानगी मिळणार असल्याची माहिती मिळाली.
कवठेएकंदच्या आतषबाजीवर निर्बंध?
By admin | Updated: October 8, 2015 00:58 IST