लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मान्सूनच्या पावसाच्या पहिल्याच दमदार एन्ट्रीने गुरुवारी सांगलीकरांनी दैना उडाली. शहरातील श्यामरावनगर, चिंतामणीनगर, गव्हर्नमेंट काॅलनी परिसरातील दोनशेहून अधिक घरांत पाणी शिरले आहे. तर, दूषित शेरीनाला पुन्हा कृष्णा नदीत मिसळत आहे. सखल भागासह उपनगरांत पाण्याची तळी साचली असून नाले, गटारे ओव्हर फ्लो होऊन वाहत होते. महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा फज्जा उडाल्याचे या पावसात स्पष्ट झाले.
बुधवारी शहर परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. रात्री अकरानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी सहा वाजेपर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाच्या दमदार एन्ट्रीने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील मुख्य चौकात बराचवेळ पाणी साचून होते. गावठाणातील अनेक तळघरांत पाणी शिरले आहे. चौक, रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होण्यास तीन ते चार तासांचा कालावधी लागला.
विस्तारित भाग, उपनगरांत पावसाने हाहाकार माजविला आहे. श्यामरावनगर परिसरातील ७० ते ८० घरांत पाणी शिरले. तर, शेकडो घरांना पाण्याने वेढा दिला. चिंतामणीनगरमधील ५० घरांना पाण्याने वेढा दिला आहे. संजयनगर परिसरातील जगदाळे प्लाॅट, पत्र्याची चाळ, पारिजात हडको काॅलनी परिसरातील अनेक घरांत पाणी शिरले. अभयनगर, चिन्मय पार्कपासूनचे पाणी चिंतामणीनगर येथील रेल्वे पुलाखालून नाल्याला मिसळते. पण, दीड फुटाचे पाइप असल्याने या परिसरातील पाणी तुंबले होते. वानलेसवाडी, गव्हर्नमेंट काॅलनीत तळे साचले होते. जिल्हा न्यायालयालगतच्या रस्त्यावरून पाणी वाहत होते. भीमनगरमधील अनेक झोपड्याही पाण्याखाली गेल्या होत्या. टिंबर एरियातील सखल भागांतही पाणी साचले होते. वखार भागातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी होते. राम मंदिर चौकात नव्याने केलेल्या काँक्रिट रस्त्यामुळे पाणी तुंबले होते. श्यामरावनगरमधील अनेक मोकळे प्लाॅट पाण्याने तुडुंब भरले आहेत. ड्रेनेज, केबलसाठी खोदाई केलेले रस्ते चिखलमय झाले होते. विष्णुअण्णा फळमार्केटमध्येही पावसाचे पाणी साचून होते. पहिल्याच पावसाने महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचा फज्जा उडाला.
चौकट
शेरीनाला कृष्णा नदीत
शहरातील बहुचर्चित शेरीनाल्याचे दूषित पाणी पुन्हा नदीपात्रात मिसळत आहे. पावसामुळे शेरीनाला तुडुंब भरून वाहत आहे. नाल्याच्या बंधाऱ्यावरून पाणी नदीपात्राकडे जात होते. त्यात धुळगाव योजना बंद असल्याने शेरीनाल्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले.
चौकट
क्रीडांगणे, शाळेत पाणी
शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर गुडघाभर पावसाचे पाणी साचले होते. क्रीडांगणावरील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावरही पाणी आले होते. महापालिकेच्या अनेक शाळांनाही पाण्याने वेढा दिला आहे.