मिरज : मिरज शहर व पूर्व भागात गुरुवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने रस्त्यातील खड्ड्यात वाहने अडकली होती.
शहर व उपनगरात सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची दैना उडाली. मिरज ते बोलवाड रस्त्यावर ड्रेनेज कामासाठी केलेल्या खुदाईमुळे खड्ड्यात ट्रक अडकला. येथील रहिवाशांची रस्त्याने ये-जा करण्यासाठी मोठी कसरत सुरू होती.
गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसाने लक्ष्मी मार्केट, किसान चौक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी रोड, रेल्वे स्थानक चौक, एसटी स्थानक परिसर, शास्त्री चौक, दत्त चौक परिसरात रस्ते जलमय झाले. रस्त्यावरील विक्रेत्यांची दैना उडाली. विस्तारित भागात चिखलाचे साम्राज्य होते. पाणी योजनेसाठी शहरात खोदलेल्या रस्त्यांची पावसाने दुर्दशा झाली. दिवसभर पाऊस सुरूच असल्याने शहर व ग्रामीण भागात जनजीवन ठप्प झाल्याचे चित्र होते. मिरज शहराबरोबर ग्रामीण भागात पावसाने सोयाबीन, ज्वारी व पालेभाज्यांचे नुकसान झाले. मालगांव, म्हैसाळ, खंडेराजुरी, सलगरे, एरंडोलीसह मिरज पूर्व भागातील अनेक गावांत शेतात पाणी साचले होते.