ख्रिश्चन बंगल्यानजीक असलेल्या मैदानावर बेकायदेशीर बांधण्यात आलेले पत्र्यांचे शेड.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहराची वाढती लोकसंख्या पाहता खेळाची मैदाने नाहीतच. त्यामुळे ख्रिश्चन बंगल्याच्या परिसरात असलेल्या खासगी मालकीच्या मैदानात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊ लागली आहेत. तरी सुद्धा या मैदानावर सकाळच्या सत्रात नागरिक फिरण्यासाठी येतात, तर संध्याकाळी अंधार पडताच याच ठिकाणी मद्यापींच्या पार्टीच्या बैठका सुरू होतात. त्यामुळे या परिसरात मोकळ्या बाटल्यांचा सडाच असतो.
लोकसंख्येच्या मानाने खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मैदानाची कमतरता आहे. विद्यालयाची मैदाने आहेत; परंतु या ठिकाणी इतर मुलांना खेळण्यासाठी परवानगी नाही. उरुण परिसरात असलेल्या शासकीय मैदानाचे काम अजूनही संथगतीने चालू आहे. पोलीस कवायती मैदानावर फिरण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आला आहे. परंतु, या ठिकाणी खेळ खेळण्यास मज्जाव आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी खेळाडूंना ख्रिश्चन बंगल्यानजीक असणाऱ्या मैदानाचा आसरा घ्यावा लागतो, तर बहुतांशी खेळाडू वाघवाडी यासारख्या ग्रामीण भागातील मैदानावर खेळण्यासाठी जातात.
सांगली-पेठ रस्त्यावरील ख्रिश्चन बंगल्यानजीक असलेल्या या मैदानावर घाणीचे साम्राज्य आहे. याच मैदानालगत असलेल्या रस्त्यावर बेकायदेशीर खोक्यांचे साम्राज्य वाढले आहे. काहींनी तर एका रात्रीत पत्र्यांची खोकी उभारली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात खेळणाऱ्यांना हे मैदान अपुरे पडत आहे, तर या ठिकाणी काचेच्या मोकळ्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात असल्याने खेळाडूंना आणि फिरायला येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मैदानावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रात्रीच्या वेळी दारुड्यांसाठी हा अड्डा बनला आहे. तरी पोलिसांनी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चौकट
अवैध शेड उभारले
याच मैदानालगत सांगली येथील एका व्यापाऱ्याने भव्य-दिव्य असे पत्र्याचे शेड उभारले होते. यावर काही राजकारण्यांनी आवाज उठविल्यानंतर हे शेड अर्धवट स्थितीत असल्याने याठिकाणी रात्री अवैध काम सुरू असतात.