इस्लामपूर : राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात आपली भूमिका ठामपणे मांडून समाजास न्याय द्यावा, यासह अनेक मागण्यांचे निवेदन इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तहसीलदारांना देण्यात आले़ याबाबत तातडीने योग्य कार्यवाही न झाल्यास शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.शासनाने मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात १६ टक्के आरक्षण लागू केले आहे़ त्यास न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिल्याने समाजाचे मोठे नुकसान होणार आहे़ याबाबत राज्य शासनाने ठाम भूमिका मांडून लवकरात-लवकर मराठा समाजाच्या मुला-मुलींना नोकरी व शिक्षणामध्ये दिलेले आरक्षण कायम ठेवावे़ तसेच धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. मुस्लिम समाजास नोकरीत आरक्षण कायम ठेवावे.राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात उभारले जात असून, या कामाची लवकरात-लवकर सुरुवात करण्यात यावी, अण्णासाहेब पाटील महामंडळास ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत़ त्याचप्रमाणे याबाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.याप्रसंगी शंकर चव्हाण, रणजित गायकवाड, मानसिंग पाटील, महेश परांजपे, संदीप माने, मुकुंद कांबळे, प्रवीण पाटील, माणिक करे, शकील जमादार, वसंतराव कुंभार, उत्तम काजवे, राजू सावकार, अशोक भिंगार्डे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडावी
By admin | Updated: December 1, 2014 00:09 IST