इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथे दोन वर्षांपूर्वी शिवीगाळ करण्याच्या प्रकारातून घडलेल्या खून प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी एका आरोपीला दोषी धरुन त्याला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सचिन सुभाष लोंढे (वय २६, रा. भीमनगर- पेठ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दंडाची रक्कम न भरल्यास आणखी ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. अमोल शामराव पवार (वय ७0, रा. पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी व अमोल हे दोघे मित्र होते. या खटल्यात फिर्यादीतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश पाटील (बोरगावकर) यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मृत अमोल शामराव पवार आणि आरोपी सचिन सुभाष लोंढे हे दोघे मित्र होते. २२ जुलै १४ रोजी हे दोघे पेठनाका येथील शिवाजी मराठा खानावळी शेजारील दारु दुकानात दारु पिण्यासाठी एकत्रीतपणे गेले होते. तेथून दारु पिवून ते साडेनऊच्या सुमारास बाहेर पडले. पाऊस असल्यामुळे दोघे एका मोकळ्या शेडमध्ये थांबले. त्यानंतर किरकोळ कारणावरुन दोघांत वाद सुरु झाला.रागाच्या भरात अमोल पवार आरोपी सचिन लोंढे याला शिवीगाळ करु लागला. लोंढे हा त्याला शिवीगाळ करु नकोस असे सांगत होता. तरीही अमोल शिवीगाळ करीत राहिला. राग अनावर झाल्यानंतर लोंढे याने दगड उचलून तो अमोलच्या डोक्यात घातला. यामध्ये अमोलचा मृत्यू झाला. शामराव पवार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. (वार्ताहर)तीन साक्षीदार महत्त्वाचे : अकरा तपासातया खटल्याची सुनावणी न्या. श्रीमती होरे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात प्रत्यक्ष घटना पाहणारे कोणी नव्हते. मात्र मृताला आणि आरोपीला एकत्रितपणे वावरताना पाहणारे तीन साक्षीदार महत्त्वाचे ठरले. सरकारी वकील सुरेश पाटील यांनी आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. या बाबी ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सचिन लोंढे याला जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.
पेठनाका येथील खून प्रकरणी एकास जन्मठेप
By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST