इस्लामपूर : शहरातील उरुण परिसरातील खेड रस्त्यावरील शेतात पाणी पाजण्याचे काम करणाऱ्या पाटकऱ्याचा डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून खून करण्यात आला. ही घटना साेमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. शेतातील पाणी रस्त्यावर सोडल्याच्या वादातून हा प्रकार घडला. घटनेनंतर यातील हल्लेखोराने पलायन केले.
अशोक आनंदा पाटील (वय ४३, रा. साखराळे, ता. वाळवा) असे खून झालेल्या पाटकऱ्याचे नाव आहे, तर प्रशांत बाबूराव पाटील (रा. पाटील गल्ली, सहारा सिटी) असे हल्लेखोराचे नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत अजित रामचंद्र पाटील (रा. कोरेगाव) यांनी इस्लामपूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अजित पाटील यांच्या बहिणीची नवरा-नवरी नावाच्या परिसरात शेतजमीन आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी पाणी योजना केली आहे. या पाणी योजनेमध्ये अशोक पाटील हे भागीदार असून ते पाटकरी म्हणून काम पाहत होते. ३१ जानेवारीस दुपारी १२ वाजता संशयित हल्लेखोर प्रशांत पाटील याचे वडील बाबूराव भगवान पाटील यांनी अशोक पाटील यांना ‘तू नीट पाणी पाजत जा, तू मुद्दामहून वाटेवर पाणी सोडतोस’, असे म्हणून शिवीगाळ केली होती.
वडिलांबरोबर झालेल्या या वादाचा राग डोक्यात घेऊन प्रशांत पाटील याने साेमवारी दुपारी शेतात येऊन अशोक पाटील यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर वळ उठले. तसेच डोक्यात पाठीमागील बाजूस लोखंडी गजाचा वर्मी घाव बसल्याने अशाेक रक्ताच्या थारोळ्यात शेतामध्येच कोसळले. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर प्रशांत याने तेथून पलायन केले. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख अधिक तपास करीत आहेत.
फाेटाे : ०१ अशाेक पाटील (मृत)