सांगली : मिरज तालुक्यातील मानमोडी फाटा ते काननवाडी फाटा या दरम्यान बुधवारी रात्री अपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले. १०८ रुग्णवाहिकेस दूरध्वनी करूनही अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते यांनी त्यांच्या कारमधून रुग्णांना सांगलीला नेऊन दाखल केले. तातडीची वैद्यकीय सुविधा व गोल्डन अवर थिअरीकडेच दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव नागरिकांना आला.
बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व सायकलची समोरासमोर जोरात धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार शुभम शामराव पाटील (२१, रा. कवठेएकंद) व मानमोडी (ता. मिरज) येथील सायकलस्वार ५५ वर्षीय व्यक्ती रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाले होते. परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी याठिकाणी गर्दी केली. त्यातील एकाने १०८ क्रमांकावर कॉल केला. समोरच्या व्यक्तीने तातडीने निघत असल्याचे सांगितले. मात्र, अर्धा तास झाला तरी रुग्णवाहिका आली नाही.
युवक राष्ट्र विकास सेनेचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते हेसुद्धा तिथे आले. रुग्णवाहिका येत नसल्याचे त्यांना कळल्यानंतर त्यांनी तातडीने दोन्ही रुग्णांना त्यांच्या कारमधून भारती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात कार आल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने दूरध्वनी करून येत असल्याचे सदामते यांना सांगितले. तोपर्यंत उपचार सुरू झाले होते. वेळेत त्यांना दाखल केल्याने दोन्ही रुग्णांचा जीव वाचला. मात्र, रुग्णवाहिकेच्या दिरंगाईबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.
चौकट
‘गोल्डन अवर थिअरी’चे काय?
शासनाकडून दिली जाणारी १०८ रुग्णवाहिका सेवा ही तातडीची बाब आहे. रुग्णांना एका तासात जवळच्या रुग्णालयात पोहोचवून त्याचा जीव वाचविण्यासाठी ‘गोल्डन अवर थिअरी’चे पालन करायला हवे, असा नियम आहे. ३६५ दिवस २४ तास मोफत असलेली ही सेवा आहे. तरीही बुधवारच्या घटनेने याचे पालन होत नसल्याचे दिसून आले.
कोट
तातडीची वैद्यकीय सुविधा असूनही दिरंगाई का होते? रुग्णांचा अशावेळी जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण?
-प्रशांत सदामते, प्रदेशाध्यक्ष युवक राष्ट्र विकास सेना