जत : जत तालुक्यातील राजकीय पटलावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विस्तार करताना दिसुन येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणुन आगामी काळात तालुक्यात राजकीय घडामोडींचे विषय चर्चेत राहणार असुन राष्ट्रवादीच्या या विस्ताराचा कोणाला फटका बसणार आणि फायदा होणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागुन आहे.
राष्ट्रवादी पक्ष स्थापनेवेळी जे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाशी कट्टर राहिले; ते आजही राष्ट्रवादी पक्षात आहेत. काहीजण मोदी लाटेत राष्ट्रवादीतुन बाहेर पडले; ते आजही पक्षापासुन दोन हात लांबच आहेत. मात्र पालकमंत्री जयंत पाटील यांना मानणारा गट सध्या तालुक्यात सक्रिय आहे. उमदीचे चंण्णाप्पा होर्तीकर, सिध्दांणा शिरसाड, रमेश पाटील, उत्तम चव्हाण, सुरेशराव शिंदे हे राष्ट्रवादीचे जत तालुक्यातील प्रमुख शिलेदार म्हणुन ओळखले जातात.
सुरेश शिंदे यांनी जत नगरपरिषदेची सत्ता राखली. वळसंग ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला. होर्तीकर यांनी आपला उमदी गट भक्कमपणे ठेवला आहे. आत्ता पश्चिम भागातून माजी पंचायत समिती सभापती मन्सूर खतीब व त्यांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. उत्तर भागातून रेल्वे बोर्डाचे संचालक व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे हे प्रवेश करणार आहेत.
पूर्व भागाचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील हे राजकारणातील जाणकार नेते आहेत. त्यांनी राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राजकारणास सुरुवात केली आहे. राजारामबापूंचे निधन झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २० वर्षे त्यांनी काँग्रेसचे जत तालुकाध्यक्षपद म्हणून काम केले आहे. अलीकडे ते जनसुराज्य पक्षाचे नेते म्हणून काम पाहात होते. आता तेही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याने पक्षातील कार्यकर्तेही रिचार्ज होत आहेत.
चाैकट
पाणी योजनेवर नेत्यांचे लक्ष
वारणा प्रकल्पातून जत तालुक्याला सहा टीएमसी पाणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पक्षाची जत तालुक्यात लोकप्रियता वाढली आहे. त्यातच आज अनेकजण प्रवेश करणार असल्याने पक्षाची जत तालुक्यात ताकद वाढणार आहे.