फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे अर्धवट स्थितीत असलेले गटारीचे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची-हेरवाड व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गाचे काम झाले असून, मायणी रोडला दिघंची बस स्थानक ते संगम मंगल कार्यालय, आटपाडी रोड, पडळे मॉल व पंढरपूर रोड या ठिकाणचे गटारीचे काम अर्धवट आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलेले आहे. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले असून, गटारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी केली आहे.
गटारीच्या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम केले असून, काही ठिकाणी गटार बांधण्यात आली आहे, तर काही ठिकाणी खड्डे काढण्यात आले आहेत. बस स्थानक परिसरात गटारीचे काम अर्धवटच असल्याने फक्त खड्डेच काढण्यात आले असल्याने या भागातील दुकानात जाण्यासाठी ग्राहकांना पुरेशी जागाही नसल्याने दुकान बंद ठेवण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.
दिघंची-मायणी रोडवर खत व पशुखाद्य दुकाने, बांधकाम साहित्याची दुकाने आहेत. त्यांना अवजड साहित्य उचलून नेण्यास फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दवाखान्यात जाण्यासाठी पेशंटलाही त्रास होत आहे. दुकानात येण्यासाठी ग्राहकांना पुरेशी जागा नाही. संबंधित विभागाने याची दखल घेऊन गटारीची काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.