सांगली : पलूस येथील मानसी जयसिंग पाटील (वय ३२) या महिलेचा सोमवारी पहाटे ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला. त्यांच्यावर सहा दिवसांपासून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. स्वाइनचा आठवड्यातील हा चौथा बळी आहे.मानसी पाटील यांना पंधरा दिवसांपासून ताप, खोकला व सर्दीचा त्रास सुरु होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने स्वाइनची लागण झाल्याची शंका व्यक्त करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. नातेवाईकांनी १६ सप्टेंबर रोजी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीला पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीचा अहवाल १८ सप्टेंबरला आला. यामध्ये त्यांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. रविवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली होती. यातच सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)अहवालाची प्रतीक्षाचार दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूसंशयित दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अद्यापही त्यांचे अहवाल आलेले नाहीत. सध्या शासकीय रुग्णालयात स्वाइनचा एकही रुग्ण दाखल नाही.
पलूसच्या महिलेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू
By admin | Updated: September 21, 2015 23:42 IST