लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : पलूस तालुक्यातील ३२ मुलांचे वडील तर दोन मुलांच्या आईचे कोरोनाने निधन झाले आहे. या मुलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांना भावनिक, आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे. शासनाने मदतीचा हात पुढे केला असला तरी समाजातूनही या मुलांना आधार मिळण्याची गरज आहे.
पलूस तालुक्यातील ३२ मुलांनी कोरोनामुळे वडिलांचे छत्र गमावले तर दोन मुलांच्या आईचे निधन झाले आहे. कोरोनामुळे तालुक्यामधील अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आजअखेर तालुक्यात नऊ हजार ४०१ कोरोनाबाधितांची संख्या असून, २५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामध्ये ज्या कुटुंबावर आघात झाले त्यांना शासन मदत करेल. परंतु, समाजातून या कुटुंबांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सहृदयी असणे आवश्यक आहे. बरीचशी कुटुंब ही हातावर पोट असणारी आहेत. या कुटुंबातील मुलांना भविष्यात आर्थिक गरजेबरोबर सामाजिक आणि आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागणार आहे. कर्ता पुरुष गेल्याने घरावर मोठे संकट निर्माण होते. पतीच्या निधनामुळे महिलेची मोठी घालमेल होते. लहान मुलांचे संगोपन करण्यासह कुटुंब चालविण्यापर्यंतचे प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत मानसिक आधार सगेसोयरे देतच असतात. पण आर्थिक आधाराची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.
महापुराच्या काळात अनेक मदतीचे हात सरसावले. आपल्या जिल्ह्याची मदतीची परंपरा अबाधित ठेवली. पण महापुरात आर्थिक नुकसान होते. कोरोनाने आर्थिकसह या कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष नव्याने सुरू करावा लागला आहे. शासन त्याच्या स्तरावर प्रयत्न करत आहे. या कुटुंबांची यादी तयार केली आहे, त्यांना मदत मिळेलही. परंतु, समाजाने समाजभान ठेवून त्यांना पदोपदी आपले दातृत्व दाखवावे आणि या कुटुंबांना पुन्हा उभे करावे.