लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथे पंचायत समितीच्या सदस्या रूपाली सपाटे यांनी स्वत:चे दोनमजली घर कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यास दिले आहे. याबद्दल परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
साटपेवाडी गावात घरोघरी कोविडचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे हे गाव कोरोनाचा हाॅट स्पाॅट बनले आहे. सोमवारी या गावात जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी भेट देऊन ग्रामपंचायत व आरोग्य विभागास सूचना दिल्या. तसेच गावात कोरोना विलगीकरण कक्ष उभारून त्यात रुग्णांना दूरचित्रवाणी बेड व चहा, नाष्टा, जेवण देण्यात यावे, अशा सूचना दिल्या.
यावर दक्षता समितीने विलगीकरण कक्षाला जागा नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. यावर क्षणाचाही विलंब न करता उपस्थित असलेल्या पंचायत समिती सदस्या रूपाली सपाटे व त्यांचे पती प्रकाश सपाटे यांनी त्वरित बनेवाडी फाट्यावर असलेले आपले दोनमजली घर विलगीकरण कक्षासाठी देत असल्याचे जाहीर केले. सोबत रुग्णांना चहा, नाष्टा देण्याची व्यवस्था करत असल्याचेही जाहीर केले.
ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समजताच त्यांनी या पती-पत्नीचे विशेष अभिनंदन केले. या दानशूर व धाडसी निर्णयाने सपाटे पती-पत्नीचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.
कोट
आपणही समाजाचे देणे लागतो, या उदात्त हेतूने माणसाने नेहमी सामाजिक काम करावे. समाजातील उपेक्षित, गरजू लोकांच्या मदतीला उभे राहणे हेच पुण्याईचे काम आहे.
- रूपाली सपाटे, पंचायत समिती सदस्या