सांगली : वाहनांवर नियमबाह्य क्रमांक टाकणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक पोलिसांनी आज (शनिवार) दुसऱ्यादिवशीही धरपकड सुरु ठेवली होती. शहरातील कॉलेज कॉर्नरवर तपासणीसाठी पोलिसांनी ठिय्या मारला होता. दिवभरात नियमबाह्य क्रमांकाची २० वाहने जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय गोर्ले व उपनिरीक्षक सुनील घाटगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाहनाची नंबर प्लेट कशी असावी, यासाठी नियमावली आहे. मात्र या नियमाचे कुणीही पालन करताना दिसत नाही. प्लेटवर स्वत:चे नाव, अथवा आडनाव, किंवा राजकीय नेत्याचा फोटो लावलेला असतो. महाविद्यालयीन तरुणांच्या दुचाकीवर ग्रुपची नावे लिहिण्यात आलेली आहेत. याविरुद्ध कारवाई सुरु करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून ही कारवाई सुरु आहे. दोन दिवसात ५० वाहने जप्त केली आहेत.महाविद्यालयात ग्रुप स्थापन करुन त्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून दहशत माजविली जात आहे. त्यांच्या वाहनांवरही ग्रुपची नावे लिहिण्यात आली आहेत. ही वाहने पकडण्यासाठी उपनिरीक्षक सुनील घाटगे यांनी कॉलेज कॉर्नरवर दिवसभर तळ ठोकला होता. मात्र ग्रुपचे नाव लिहिलेले वाहन त्यांच्या हाती लागले नाही. यामुळे नियमबाह्य क्रमांकाची वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई सुरुच ठेवली जाणार आहे. (प्रतिनिधी)
नियमबाह्य क्रमांक; वीस दुचाकी जप्त
By admin | Updated: July 27, 2014 00:31 IST