बहे नाक्यावर वीस जणांचा पोलीस ताफा असूनसुद्धा दुचाकीस्वार सुसाट धावतायत.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात रोज सरासरी २०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण होत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक चौकात पोलीस फौजफाट्यासह गृहरक्षक दल आहे. तरी सुद्धा ग्रामीण भागातून येणाऱ्या दुचाकीस्वारांची गर्दी कमी झाली नसल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे.
इस्लामपूर, आष्टा शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज सरासरी २०० हून अधिक कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने चौकाचौकातून फौजफाटा उभा केला आहे. तरी सुद्धा ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा लोंढा थांबेना. त्यामुळेच रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही. पोलीस फक्त कारवाईचा दिखाऊपणा करत आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू असून भाजी खरेदीच्या नावाखाली नागरिक बाहेर पडताना दिसतात. पानपट्टी, कापडदुकाने, सोन्या-चांदीचे व्यापारी, स्टेशनरी, कटलरी, बांधकामासाठी मिळणारे साहित्यांची दुकाने, रंग, सिमेंट आदी व्यवसाय करणारे व्यापारी पुढे दरवाजा बंद मागे चालू या पद्धतीने आपली दुकाने चालू ठेवतात. त्यामुळे शहरात सर्व काही खरेदीसाठी आलबेल असल्याचे चित्र असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
आरोग्य विभागाकडून लसीकरण युद्धपातळीवर चालू आहे. सध्या बहुतांशी नागरिकांचा ८४ दिवसांनंतर दुसरा डोस सुरू आहे. काही नागरिकांचा कालावधी संपून गेला तरी त्यांना वेळेत लस मिळत नाही. शहरासह ग्रामीण भागात लॉकडाऊनचा फज्जा उडाल्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे चित्र आहे. यावर प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून आहे.