सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखा आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘आनंदी शिक्षणाचा उंबरठा’ या विषयावर राज्यस्तरीय मराठी दीर्घांक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सध्या शिक्षणविषयी विविध पातळीवरील समस्या, अनास्था यामुळे शिक्षण क्षेत्राच्या दर्जावर परिणाम झालेला दिसून येतो. शिक्षणोत्तर गुणवत्ता यामुळे शंकास्पद ठरू लागली आहे. अशा या कालबाह्य शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून नव्या आव्हानांचा यशस्वी सामना करू शकणाऱ्या सर्व संबंधित घटकांना शिक्षण प्रक्रियेचा आनंद देणारी व्यवस्था उभी करावी लागेल. शिक्षण ही निरंतर आणि व्यवसायाभिमुख प्रक्रिया आहे, हे परिणामकारकरीत्या मांडावे लागेल. या आणि अशा आशय विषयांचा धांडोळा घेऊन नव्या आनंदी शिक्षणाचा उंबरठा साहित्य कृतीतून चितारत जावा आणि उत्तम नाट्यनिर्मिती व्हावी अशी ही या प्रयोगक्षम मराठी दीर्घांक लेखन स्पर्धेची संकल्पना आहे.
संहितेचा रंगमंचीय सादरीकरण कालावधी ९० मिनिटांचा असावा. संहिता स्वतंत्र असावी. भाषांतरित किंवा आधारित असल्यास तसा उल्लेख करावा, आदी नियम स्पर्धेसाठी लागू केले आहेत. संहिता १५ जून २०२१ पर्यंत पाठवावी, असे आवाहन केले आहे. स्पर्धेसाठी आलेल्या संहितांमधून तीन उत्कृष्ट संहिता निवडल्या जातील. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपये अशी रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. संहितांच्या संख्येनुसार उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.