आष्टा : आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर व साईनगरमधील रहिवाशांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त वसाहत सभागृहात कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्पला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारीही कॅम्प सुरू राहणार आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दत्त वसाहत, गांधीनगर व साईनगरमधील गट क्रमांक ४, ६, ९ मधील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून खरेदी-विक्री करता येत नाही; तसेच बँकेचे कर्जही मिळणे बंद झाले आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने महसूल विभागाच्या वतीने तातडीने कॅम्प लावण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये मंडलाधिकारी सचिन सगर, तलाठी सागर सूर्यवंशी, रवींद्र कानडे, अमर साळुंखे, अभयकुमार उपाध्ये, फाळके यांच्यासह नगरसेवक अर्जुन माने, समीर गायकवाड, मनीषा जाधव, बबलू नायकवडी, रमेश रसाळ, दमामे हे महसूलचे कर्मचारी नागरिकांकडून जमिनीच्या व्यवहाराचे दस्त तत्कालीन किंमत व साल यांची माहिती घेत आहेत.