इस्लामपूर : खरेदी केलेल्या शेतजमिनीचे बिगरशेती प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये खाडाखोड करून नगरपालिका व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने येथील न्यायालयाने नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांना पात्र जामिनासह २० आॅगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी माजी नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी आॅक्टोबर २०१३ मध्ये तत्कालीन नगरसेवक व विद्यमान नगराध्यक्ष सूर्यवंशी यांच्याविरुध्द येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी २००१ मध्ये मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या पाठीमागे १० गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. त्यानंतर ही जमीन बिगरशेती करण्यासाठी १९ मार्च २००५ मध्ये त्यांनी नगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये सर्व शासकीय दस्तऐवजातील २००१ वर्षाच्या ठिकाणी २००० असा उल्लेख करून त्यांनी २४ मार्च २००५ रोजी सहाव्यादिवशी नगरपालिकेकडून गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र मिळवले होते. हे प्रमाणपत्र मिळवताना नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी सर्व कागदपत्रांमध्ये बेकायदेशीरपणे खाडाखोड करून पालिका व शासनाची फसवणूक केल्याचा आक्षेप बाबासाहेब सूर्यवंशी यांनी घेतला होता.या दाव्याची प्राथमिक दखल घेऊन न्यायालयाने अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यावर पोलिसांनी यातील सर्व दस्तऐवजांची तपासणी करताना सुभाष सूर्यवंशी यांचा जबाब नोंदवून घेतला. न्यायालयात दिलेल्या अहवालात पोलिसांनी या गुन्हाच्या तपासादरम्यान कागदपत्रांचे अवलोकन करताना खरेदीपत्र, दस्तऐवजामध्ये खाडाखोड करून फेरफार झाल्याचे मत दिले आहे. या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने आता सुभाष सूर्यवंशी यांना २० आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)
सुभाष सूर्यवंशींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
By admin | Updated: August 12, 2014 23:17 IST