आरगच्या पाझर तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. यावेळी संतोष देसाई, सर्जेराव खटावे, सुधीर कवाळे, विजय देसाई आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : आरग येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस संतोष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांना निवेदन दिले होते.
आरगमध्ये महिन्याभरापासून पाणीटंचाई जाणवत आहे. पाझर तलाव कोरडा पडल्याने गावाची पाणीयोजना बंद आहे. ग्रामस्थांनी मंत्री पाटील यांना सांगितले की, पिण्याच्या पाण्याअभावी हाल सुरू आहेत. जनावरांनाही पाणी मिळेना झाले आहे. म्हैसाळ सिंचन योजनेतून उपसा सुरू होऊन महिना झाला, पण पैशांअभावी योजनेचे पाणी गावाला दिले जात नाही. टंचाई दूर करण्यासाठी योजनेचे पाणी पाझर तलावात सोडण्याची गरज आहे.
मंत्री पाटील यांनी योजनेच्या अधिक्षक अभियंत्यांना पाझर तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यासाठी टंचाई निधीतून तरतुदीची सूचनाही केली. ग्रामस्थांच्या वतीने संतोष देसाई यांच्यासह सर्जेराव खटावे, आबासाहेब पाटील, जयसिंग गायकवाड, विजय देसाई, गणेश पाटील, सुधीर कवाळे, सचिन माळी, संजय नागठाणे, महादेव बिंदले आदींनी पाटील यांची भेट घेतली.