सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता गृहीत धरून सर्व पाझर तलाव आणि बंधाऱ्यांच्या पाहणीचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सोमवारी दिले. अभियंत्यांनी पाहणी करून अहवाल द्यावा, असे छोटे पाटबंधारे विभागाला सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेत ७२५ तलाव आणि ३७५ बंधारे आहेत. छोटे पाटबंधारे विभागाकडून त्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. सध्या पावसाने जोर धरला असून अतिवृष्टीची संभावना लक्षात घेण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांची व्यवस्थापन उपकेंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व बंधारे व तलावांच्या मजबुतीची पाहणी त्यांनी करावी, असे आदेश कोरे यांनी दिले. अतिवृष्टी झाल्यास त्यांना धोका होऊ शकतो का, याचा अहवाल मागविला.
बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ अंदाजपत्रके सादर करण्यास सांगितले आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बरगे काढून ठेवण्यास सांगितले आहे. आपत्कालीन स्थितीची माहिती त्वरित द्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.