फोटो ओळ : कुपवाडमधील हासुरेनगरमधील नाल्यात निचऱ्याची सोय नसताना नव्या गटारीचे मैला मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. याला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : शहरातील चाणक्य चौकालगत असलेल्या हासुरेनगरमधील नाल्यामध्ये अष्टविनायकनगरमधून आलेल्या नव्या गटारीचे मैलामिश्रित गटारीचे सांडपाणी सोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी स्थानिक नगरसेवकांना वारंवार सांगूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. येथे नवीन गटारीचे मैलामिश्रित सांडपाणी सोडल्यास नागरिकांनी सुरू असलेले काम बंद पाडू, असा इशारा देण्यात आला आहे.
येथील प्रभाग क्रमांक आठमधील चाणक्य चौकालगत असलेल्या हासुरेनगरमध्ये जुना नाला कार्यरत आहे. हा नाला हासुरेनगरपुरता मर्यादित असून, हा नाला कायमस्वरूपी कोरडा असतो. या नाल्यात सध्या महापालिका प्रशासनाकडून अष्टविनायकनगरमधील मैलामिश्रित गटारीचे सांडपाणी सोडण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी नव्याने बंदिस्त गटारीचे काम सुरू आहे. मात्र, हासुरेनगरमधील नाल्यातील पाणी निचऱ्याची सोय नसल्याने तुंबून राहते. त्यात नव्याने अष्टविनायकनगरमधील गटारीचे पाणी सोडल्यास आणखीन समस्या गंभीर बनणार आहे.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा. या भागातील नाल्याच्या सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था झाल्याशिवाय या नाल्यात नवीन आलेल्या गटारीचे सांडपाणी सोडू नये. अन्यथा नव्या गटारीचे काम बंद पाडण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे.
यावेळी रमेश जाधव, शंकर हजारे, विठ्ठल लमने, अकबर उस्ताद, रवींद्र भोसले, शिवाजी वाघमारे, किरण कवडे, अनिल जनवाडे, अनंत बनसोडे, सचिन साळुंखे, शशिकांत वाघमोडे, निखिल निकम, केशर खुडे, नंदा बनसोडे, श्रीकांत चौगुले, यल्लाप्पा वाघमोडे उपस्थित होते.