सांगली : कृषीपंपांच्या मीटर रीडिंगप्रमाणे बिल करून ५० टक्के सवलत द्यावी, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. सरकारमध्ये असल्याने त्याचे काहीही परिणाम झाले, तरी आम्ही अकारण वीजतोडणीला विरोध करू, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, एखाद्या शेतकऱ्याचा ३ अश्वशक्तीचा पंप असताना त्याला ५ अश्वशक्तीचे बिल दिले जात असेल, तर ते कसे मान्य करायचे? हे पाप कुणी केले? एकेका शेतकऱ्याला पाच लाखांची बिले आली आहेत. शेतकऱ्यांना लुटू द्यायची भूमिका आम्ही कदापि घेणार नाही. सरकारने ५० टक्के वीजबिल सवलत दिली आहे, तर ती रीडिंग घेऊन दिली पाहिजे. त्यासाठी सोमवारी १५ मार्च रोजी ऊर्जामंत्र्यांशी, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करून योग्य निर्णय घेऊ.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या प्रश्नावर भाजप दुटप्पी वागते. एरव्ही, या प्रश्नावर बोलणारे त्यांचे नेते आता कर्नाटकात त्यांचेच सरकार सत्तेवर असल्याने मौन बाळगून आहेत. केंद्र सरकार इंधन, गॅस व खाद्यतेलांच्या दरवाढीस जबाबदार असताना त्याबाबतही मौन बाळगायचे, असे त्यांचे दुटप्पी वागणे आता जनतेला कळले आहे.
काँग्रेसवर होत असलेला घराणेशाहीचा आरोप चुकीचा आहे. ज्या नेत्यांनी जिल्ह्यासाठी, राज्यासाठी योगदान दिले, त्यांचा वारसा घेऊन काम करणाऱ्या त्यांच्या मुलांना, कुटुंबीयांना संधी मिळाली म्हणून घराणेशाहीचा आरोप करणे चुकीचे आहे. संपूर्ण राज्यात आम्ही पक्षवाढीसाठी काम करीत आहोत. वातावरण चांगले आहे. आगामी काळात राज्यात पक्षाची ताकद आणखी वाढेल, असे ते म्हणाले. यावेळी आ. मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील उपस्थित होते.
चौकट
सांगलीत काँग्रेसचाच खासदार होईल
पटोले म्हणाले की, जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस बळकट होईल. मी भविष्यवेत्ता नसलो तरी सांगलीत आगामी खासदार आमचाच असेल, हे वातावरणावरून मी सांगू शकतो.
चौकट
भाजप, राष्ट्रवादी प्रतिस्पर्धी नाही
भाजप व राष्ट्रवादी हे दोन्हीही आमचे प्रतिस्पर्धी नाहीत. पक्षवाढीसाठी कोणत्याही पक्षाने अन्य पक्षातील लोकांना घेतले म्हणून वाईट वाटणार नाही. ऊलट, आम्ही नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊ, असे पटोले म्हणाले.