देवराष्ट्रे :
नेहमी गर्दीने फुलणारे कडेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थान व परिसर ऐन श्रावणात सरकारी निर्बंधांमुळे सुनासुना आहे. सरकारने सगळीकडे मोकळीक दिली असताना, मंदिरे मात्र बंद असून, लोकांच्या धार्मिक भावना दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. सागरेश्वर मंदिर भाविकांसाठी सोमवारी खुले करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सागरेश्वर देवस्थानास प्राचीन इतिहास आहे. हे मंदिर पुरातन व हेमाडपंथी आहे. एकाचठिकाणी ४७ मंदिरे, १०८ शिवलिंग असणारे पश्चिम महाराष्ट्रातील सागरेश्वर एकमेव देवस्थान आहे. यामुळे येथे राज्यभरातून भाविक येत असतात. कोरोनामुळे सागरेश्वर देवस्थान शासन निर्णयानुसार बंद आहे. भाविक मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेत आहेत. किमान श्रावणातील शेवटच्या सोमवारी मंदिर दर्शनासाठी खुले करावे.
गायगवाळे यांनी कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील यांना निवेदन दिले. यावेळी राजेश साठे, अमित बनसोडे, विनित कांबळे, अजय आयवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.