लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील ऑनलाइन शाळा सुरू होऊन तीन आठवड्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला. अजूनही अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित आहेत. काही जणांना जुनी पाठ्यपुस्तके मिळाली, पण पूर्ण संच मिळालेला नाही. त्यामुळे पुस्तकाशिवाय ऑनलाइन शाळा भरल्याचे चित्र सर्वत्र आहे.
कोरोनामुळे गेली वर्षभर ऑनलाइन शाळा सुरू आहेत. त्यातच लाॅकडाऊनमुळे पुस्तकाच्या छपाईत अडचणी आल्या. त्यामुळे यंदा शासनाने जुनी पाठ्यपुस्तके जमा करून, ती विद्यार्थ्यांना देण्याची शक्कल लढविली. शाळेतील शिक्षकांना पुस्तके जमा करण्याच्या कामाला लावले. शिक्षकांनी पालक, विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शाळेत पुस्तके आणून देण्याचे आवाहन केले. त्याला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला, पण शिक्षकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ५० टक्के पुस्तके जमा झाली, पण त्यातही काही पुस्तके फाटलेली होती, तर काही पुस्तकेच गायब होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा संपूर्ण संच मिळू शकला नाही. कुणाकडे मराठीचे पुस्तक नाही, तर कुणाकडे गणिताचे नाही, अशी स्थिती आहे, तरीही ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू आहे. पुस्तक नसल्याने ऑनलाइन शिक्षणांतही अडचण येत आहे.
चौकटवर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली - ३९,५२६
दुसरी - ४२,६२७
तिसरी - ४३,६५८
चौथी - ४३,६१५
पाचवी- ४४,४८३
सहावी- ४३,५३६
सातवी- ४३,६०२
आठवी - ४४,०९५
चौकट
५० टक्के मुलांनीच केली पुस्तके परत
१. सर्व शिक्षा अभियानांतर्गंत शासनाच्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके जमा करण्यात येत आहेत. शिक्षण विभागाकडून दररोज त्याचा आढावा घेतला जात आहे.
२.जिल्ह्यात पहिली ते आठवीची विद्यार्थी संख्या २ लाख २७ हजार ५३७ इतकी आहे, तर १ लाख १८ हजार ८३९ विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके परत केली आहेत.
३. ही पुस्तके शाळामार्फेत विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. आता नवीन पुस्तकेही दिली जाणार आहेत.
कोट
येत्या आठ ते दहा दिवसांत नवीन पुस्तके येणार आहेत. ही पुस्तके थेट केंद्र स्तरावर येतील. येथून शाळांना त्यांचे वाटप केले जाईल. जुनी पुस्तकेही विद्यार्थ्यांना दिली आहेत.
- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी
चौकट
पुस्तकेच नाहीत अभ्यास कसा करणार?
१. ऑनलाइन शाळा सुरू आहेत. काही जुनी पुस्तके मिळाली, त्यावर अभ्यास सुरू आहे. जी पुस्तके नाहीत, तो विषय समजून घेताना अडचण येते. पाठ्यपुस्तकांविषयी शाळेतही विचारणा केली आहे.
- ऋषभ पाटील
२. शाळा सुरू होताच जुनी पाठ्यपुस्तके मिळाली. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण आणि अभ्यासात कसलाच अडसर आला नाही. पाठ्यपुस्तके जुनी असली, तरी ती सुस्थितीत आहेत.
- जान्हवी जाधव