सांगली : शहरातील बायपास रोड परिसरात कामावरून घरी निघालेल्या कामगारास जीवे मारण्याची धमकी देऊन लुटण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दीपेंद्र कबीर पन्वी (मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या बायपास रोड, सांगली) याने फिर्याद दिली असून पोलिसांनी तत्परता दाखवत संतोष विठ्ठल राक्षे, मल्हारी जगन्नाथ कांबळे (दोघेही रा. साठेनगर,सांगली) व आबा आवळे (रा. कुपवाड) अशी संशयितांची नावे असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २६ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास दीपेंद्र व त्याचा मित्र राजू वर्मा हे कामावरून घरी निघाले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांना त्यांना अडवत तुम्ही गांजा पिलाय का म्हणत दमदाटी सुरू केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दे रोख पाचशे रुपये व इतर साहित्य काढून घेतले. लुटल्यानंतर दीपेंद्र यानेे शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत संतोष राक्षे व मल्हारी कांबळे या दोघांना अटक केली आहे. अन्य एका संशयिताचा पोलिसाकडून शोध सुरू आहे.