सांगली : स्थानिक स्तर विभागाकडून झालेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याची १४ कामे ठेकेदाराने अपूर्ण ठेवली आहेत. या ठेकेदाराकडून प्रतिदिन एक हजार रूपये दंडाची रक्कम त्वरित वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी न घालता त्याच्यावर तात्काळ कारवाई करून, पावसाळ्यापूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना जि. प. अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. यावेळी गजानन कोठावळे आणि सदस्यांनी, स्थानिक स्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोल्हापूर पध्दतीची किती कामे अपूर्ण आहेत?, असा प्रश्न विचारला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी, १४ कामे अपूर्ण असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षा होर्तीकर यांनी, ज्या ठेकेदारांनी कामे अपूर्ण ठेवली आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना दिली. प्रतिदिन ठेकेदाराकडून एक हजार रूपये वसुलीची सूचनाही दिली. संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई त्वरित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी, जाधववाडी येथील ठेकेदारांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.या बैठकीत वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर गावासाठी जिल्हा नियोजनमधून ७८ लाखांची स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. गाताडवाडीसाठीही ८८ लाख ९४ हजारांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामास मंजुरी देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती मनीषा पाटील, पपाली कचरे, उज्ज्वला लांडगे, सदस्य भीमराव माने, सुवर्णा नांगरे, सुवर्णा पिंगळे, दिलीप पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)पंचवीस लाखांच्या कामाला मंजुरीकृषी विभागाकडून महात्मा फुले जल अभियान योजनेतून सोनी येथील दगडी बंधारा दुरुस्तीसाठी पाच लाख ५० हजार, वासुंबे (ता. खानापूर) साडेचार लाख, बिळूर (ता. जत) साडेतीन लाख, मुचंडी (ता. जत) पाच लाख, वांगी (ता. कडेगाव) दोन लाख आणि आटपाडी तालुक्यातील मेटकरी मळा (घरनिकी) येथील बंधाऱ्याच्या कामासाठी चार लाख ५० हजार रूपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
ठेकेदारास दिवसाला एक हजाराचा दंड
By admin | Updated: March 31, 2015 00:23 IST