लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. अजय भारत शिंदे (वय २८, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे यांनी काम पाहिले.
खटल्याची माहिती अशी की, १६ जून २०१६ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून कवठेमहांकाळ तालुक्यातील पीडित मुलगी घरात कोणाला न सांगता निघून गेली होती. नातेवाइकांनी तिचा शोध घेतला मात्र, ती मिळून आली नाही. त्यानंतर आरोपी शिंदे याच्या मोबाइवर फोन केला असता, तो स्वीच ऑफ होता. त्यानंतर कुटुंबीयांनी कवठेमहांकाळ पाेलिसांत फिर्याद दिली होती. येलदरी धरण (ता. जिंतूर, परभणी) येथे शिंदे पीडित मुलीसह पोलिसांना मिळून आला. तेथे आरोपीने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक नवनाथ वाकुडे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी होऊन उपलब्ध साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपीस शिक्षा सुनाविण्यात आली.