जत : मुचंडी (ता. जत) गावाजवळ मिनी ट्रकचा टायर फुटल्यामुळे रस्त्यालगतच्या खड्ड्यात गाडी पडून भीमणगौडा रेवाप्पा रुद्रगौडर (वय १९, रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर) ठार झाला. ही घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, टाटा मिनी ट्रक (केए २८ डी ५१९९) तासगाव येथे बेदाणा उतरून परत जतमार्गे बाबानगरकडे जात होता. भीमणगौडाया गाडीच्या चालकाचा सहायक होता. मुचंडीपासून एक किलोमीटरवर भरधाव गाडीचे टायर फुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मुरमाच्या ढिगावर आदळून खड्ड्यात गेली. भीमणगौडा गाडीतून रस्त्याकडेला असलेल्या दगडाच्या ढिगावर पडून डोक्यास मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर गाडीच्या चालकाने गाडी तेथेच सोडून पलायन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण पाटील करत आहेत.