कोकरूड : सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील शेतकरी तातोबा नारायण आस्कट (वय ७२) यांचा शेतात जात असताना पुलावरून तोल जाऊन ओढ्यात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
तातोबा आस्कट हे सय्यदवाडी येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी येळापूर सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यातूनही सावरत ते शेतीची आणि जनावरांची देखभाल करीत होते. सध्या खरीप हंगामातील मशागत सुरू असल्याने घरातील सदस्यांसोबत बांध घालण्यासाठी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ते शेतात गेले होते.
यावेळी सय्यदवाडी ते गवळेवाडीदरम्यान पुलाजवळ ते काही वेळ उभे होते. याच वेळी त्यांचा तोल गेल्याने ३० फूट खोल मेणी ओढ्यात ते पडले. डोक्यास मोठी जखम झाल्याने त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आस्कट यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.