सांगली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. १०३ शासकीय केंद्रांवर मोफत लस दिली जात असून, खासगी रुग्णालयाच्या संख्येतही वाढ केली आहे. एक लाख ५५ हजार ४२१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या १५ हजार लस शिल्लक आहे. ८० हजार लस मागविली आहे.
सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस देण्यात येत होती. मात्र, १ मार्चपासून सामान्य नागरिकांमधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षावरील आजारी रुग्णांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक काहीसे लस घ्यायला तयार नव्हते. मात्र, मागील पंधरा दिवसात लस घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह खासगी रुग्णालये आदी १०३ ठिकाणी लसीकरणाला प्रारंभ केला. एक लाख ५५ हजार ४२१ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिली लस एक लाख ३७ हजार ७९१ नागरिकांना तर १७ हजार ६३० नागरिकांना दोन्ही लसी दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यात १५ हजार लस शिल्लक असून नवीन ८० हजार लसीची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसात सांगलीत ती उपलब्ध होईल, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. लसीकरणाचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. आता दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचा लस मिळणार आहे.
चौकट
शुक्रवारपासून जिल्ह्यात ११५ नवीन लसीकरण केंद्रे
जिल्ह्यात सध्या १०३ केंद्रे आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने दि. २ एप्रिलपासून जिल्ह्यात ११५ नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आणि जुनी २१८ केंद्रे सुरु होणार आहेत, अशी माहिती डॉ. मिलिंद पाेरे यांनी दिली.
चौकट
जिल्ह्यातील असे झाले लसीकरण
-आरोग्य सेवक : ३५९६२
-फ्रंटलाईन वर्कर्स : २०६२६
-ज्येष्ठ नागरिक : ८००००
-आजारी नागरिक : १८८३३
-एकूण : १५५४२१