सांगली : जिल्ह्यात बुधवारी महालसीकरण अभियानांतर्गत ६०० केंद्रांवर विक्रमी एक लाख ४५ हजार ८८६ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले. मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाअभियानानंतर जिल्ह्यातील २१ लाख १० हजार ५५८ नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पाही पार झाला. या मोहिमेत डॉक्टर, आरोग्य सेविकांसह अन्य कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी विशेष श्रम घेतले.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी लसीकरण मोहीम राबविण्याची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे मांडली. त्यानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियान बुधवारी राबविले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी जत तालुक्यातील लसीकरण केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी भोसे, ढालगाव आणि नागज आरोग्य केंद्रांना भेट दिली. महापालिका क्षेत्रातील केंद्रावर आयुक्त नितीन कापडणीस आणि त्यांच्या आरोग्य पथकाचे बारकाईने लक्ष होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी लसीकरण मोहिमेवर नियंत्रण ठेवत तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेसाठी ६०० लसीकरण केंद्रे उभारली होती. महापालिका क्षेत्रात १९४ लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागात ३५०, शहरी भागात ५६ लसीकरण केंद्रे होती. इस्लामपूर, विटा, जत येथील केंद्रांवर नागरिकांची गर्दी झाल्यामुळे दुपारनंतर केंद्रे वाढविली. या केंद्रांवर रात्री आठपर्यंत एक लाख ४५ हजार ८८६ जणांना लसीचे डोस दिले. महालसीकरण अभियानानंतर जिल्ह्यातील २१ लाख १० हजार ५५८ नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पाही पूर्ण झाला. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची १५ लाख ३५ हजार ३४७, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची पाच लाख ७५ हजार २११ संख्या झाली आहे.
चौकट
लसीकरणासाठी राबले साडेपाच हजार कर्मचारी
लसीकरणाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आशा वर्कर्स, लसटोचक, अंगणवाडी सेविका, शिक्षक अशा साडेपाच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. लसीकरणाच्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी महालसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत केली, अशी माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली.