सांगली : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये एकास नेऊन मारहाण करून लुटण्यात आले. याप्रकरणी इकबाल सयद अंबी (वय ६७, रा. हडको कॉलनी, सांगली) यांनी चार अनोळखींविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करत मल्लीक हसीब बलवंड (वय २६, रा. पानाडे गल्ली, सांगली) या संशयितास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार, दि. २६ रोजी रात्री साडेआठच्यासुमारास फिर्यादी अंबी यांना चार संशयितांनी गोड बोलून स्टेडियममध्ये नेले व त्याठिकाणी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील ९ हजार रुपये काढून घेतले. या प्रकाराने भयभीत झालेल्या अंबी यांनी शहर पोलिसात संपर्क साधून तक्रार दिली. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी याप्रकरणी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. शहर पोलिसांनी तपास करत रात्री एकच्यासुमारास बलवंड या संशयितास अटक केली आहे. अन्य संशयिताचा शोध सुरू आहे.