तासगाव : तासगाव तालुक्यात अखेर अॅक्टिव्ह कोरोनोबाधितांची संख्या एक हजार ७४६ इतकी आहे. त्यापैकी ३६१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर तालुक्यात उपलब्ध बेडची संख्या केवळ १३१ इतकी आहे. त्यातही ग्रामीण रुग्णालय वगळता अन्य रुग्णालयांत डिपॉझिट भरून घेतल्याशिवाय रुग्णास दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची वाताहत होताना दिसून येत आहे.
तालुक्यात आजअखेर तब्बल सात हजार ९३१ रुग्ण कोरोनोबाधित झालेले असून, त्यापैकी पाच हजार ९९० रुग्ण कोरोनोमुक्त झाले आहेत. गृहविलगीकरणात एक हजार ३२४ रुग्ण उपचार घेत आहेत. आजअखेर २५५ रुग्णांचा कोरोनोने मृत्यू झाला आहे. तालुक्यात एकूण आजअखेर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार ७४६ इतकी आहे. विविध रुग्णालयांत ३६२ रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुक्यात एक खासगी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले कोविड केअर रुग्णालय या तीन रुग्णालयांची एकूण बेडची क्षमता १३२ इतकी आहे. त्यापैकी १२९ बेड केवळ ऑक्सिजनचे आहेत, तर तीनच बेड व्हेंटिलेटरचे आहेत. ग्रामीण रुग्णालय केवळ ऑक्सिजनचे बेड आहेत. या ठिकाणी शासकीय रुग्णालयामार्फत रुग्णांचा खर्च केला जातो. मात्र नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या रुग्णालयात वीस हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते, तर खासगी रुग्णालयात ४० हजार डिपॉझिट रुग्ण दाखल करण्यापूर्वी भरून घेतले जाते.
ज्यांची डिपॉझिट भरण्याची कुवत नाही, त्यांना शासकीय रुग्णालयाकडे डोळे लावून बसावे लागते किंवा उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागते, अशीच स्थिती सध्या तालुक्यात आहे.
मुळात बेडची संख्या खूपच अपुरी आहे. बेड मिळाला तर सामान्यांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना मेटाकुटीला यावे लागते. इतके करूनही उपचार करून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे.
चौकट
कोविड केअरने नाममात्र दर आकारणी करावी
तासगाव येथे खासदार संजयकाका पाटील यांच्या पुढाकारातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून कोविड केअर रुग्णालय सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतची इमारत वापरली जात आहे. खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने आणि नगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टरवगळता अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हा दवाखाना सुरू आहे. या रुग्णालयातील सर्व मशीनरी, यंत्र आदी खासदार पाटील यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाली आहे. नुकतेच या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या रुग्णालयाने कोणतेही डिपॉझिट न घेता, नाममात्र शुल्क आकारणी करून रुग्णांवर उपचार करावेत, अशी मागणी होत आहे.