फोटो १००१२०२०एसएएन ०१ : आरगमध्ये एका कुटुंबाने मते मागायला येणाऱ्या नेतेमंडळींना सणसणीत चपराक देणारा असा फलक लावला आहे.
संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राजकारण्यांच्या आयुष्यातील सर्वांत संघर्षाचा काळ कोणता म्हणाल तर तो निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी ! या काळात मतदार खऱ्या अर्थाने राजा असतो. भल्याभल्यांना त्याच्यापुढे माना तुकवाव्या लागतात. सध्या याचे प्रत्यंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवाराला अनुभवायला मिळत आहे. आरग (ता. मिरज) येथील एका सजग मतदाराने कोरोनाच्या काळात झालेल्या त्रासाचे पुरेपूर उट्टे या निवडणुकीत काढले आहेत. कोरोना काळात पाठ फिरविलेल्या नेतेमंडळींनी मत मागण्यासाठी आमच्या दारात येऊ नये, असे खडे बोल सुनावले आहेत, किंबहुना तसे फलकच घराच्या फाटकावर लावले आहेत.
प्रचाराच्या रणधुमाळीत या फलकाने नेतेमंडळींना जणू त्यांची जागा दाखवून देण्याचेच काम केले आहे. मतदानाचा दिवस संपताच मतदारांना तुच्छ लेखणाऱ्या प्रत्येक नेत्याने लक्षात ठेवावा असाच हा संदेश आहे. गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे रान उठले आहे. गल्लीबोळातून उमेदवार मते मागत फिरत आहेत.
गावात मध्यवस्तीत राहणाऱ्या शेट्टी कुटुंबाला कोरोनाच्या काळात बराच त्रास सोसावा लागला. स्वत:ला गावाचे पोशिंदे समजणाऱ्या तथाकथित नेत्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरविली. संकटकाळात नेत्यांच्या मदतीची, सहानुभूतीची गरज असल्याने शेट्टी कुटुंबाने विनंती केली
आता ग्रामपंचायतीचे रणांगण सुरू होताच नेतेमंडळींना शेट्टी कुटुंबातील मतदार दिसू लागले. उपेक्षेमुळे नेत्यांबद्दल घृणास्पद भावना निर्माण झालेल्या शेट्टी यांनी स्वयंघोषित नेत्यांना आता चार हात दूरच ठेवले आहे.
चौकट
नेते मंडळींनो, चार हात लांबच रहा !
शेट्टी यांनी घराच्या दोन्ही फाटकांवर चक्क डिजिटल फलकच लावले आहेत. कोरोनाकाळात मदत व सहकार्य केलेल्यांनीच मतदानासाठी भेटावे, अशी सूचना झळकविली आहे. कोरोनाकाळात आपण केलेले प्रताप आठवून नेतेमंडळी या घराकडे जाण्याचे धाडस करीनाशी झाली आहेत. सजग शेट्टी कुटुंबाने संधिसाधू राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.