लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील पूर ओसरू लागल्याने, आता महापालिकेसमोर स्वच्छतेचे मोठे आव्हान आहे. सोमवारी पुराचे पाणी कमी झालेल्या भागात महापालिकेने स्वच्छता, औषध फवारणी केली. आता या कामासाठी राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह पाच महापालिका धावून येणार आहेत. या महापालिकेचे कर्मचारी मंगळवारी सांगलीत दाखल होत असून, ते स्वच्छतेच्या कामात हातभार लावणार आहेत.
शहरातील पुराची पातळी बऱ्यापैकी घटली आहे. मंगळवारपर्यंत नदीचे पाणी धोक्याच्या पातळीखाली जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वच्छतेचे नियोजन हाती घेतले आहे. सोमवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना राज्यातील इतर महापालिकांकडील सफाई कामगार व यांत्रिकी साहित्य मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. २०१९ मध्ये आलेल्या महापुरानंतर राज्यातील अकरा महापालिका, नगरपालिकांचे ६५० हून अधिक सफाई कर्मचारी आपल्या वाहन आणि साहित्यासह आले होते. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत सांगली शहर स्वच्छ झाले होते.
आताही अकरा महापालिकांचे कर्मचारी स्वच्छतेसाठी सांगलीला येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, कल्याण-डोंबिवली, सोलापूरचे कर्मचारी मंगळवारी सांगलीत येणार आहेत. इतर महापालिकेचे कर्मचारीही टप्प्याटप्प्याने सांगलीत येतील. या कर्मचाऱ्याबरोबर सांगली महापालिकेचे सफाई कर्मचारी शहराची स्वच्छता करतील, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.
चौकट
१,२०० कर्मचारी सज्ज
महापालिकेचे कर्मचारी स्वच्छतेसाठी सरसावले आहेत. सोमवारी पूर ओसरलेल्या भागात महापालिकेने स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे, तसेच औषध फवारणी, पावडर फवारणीही केली जात आहे. महापालिकेचे २० स्वच्छता निरीक्षक, ४० मुकादम, १,१०५ सफाई कामगार स्वच्छतेसाठी सज्ज आहे. आयुक्त नितीन कापडणीस, डाॅ.रवींद्र ताटे यांनी स्वच्छतेचे नियोजन केले आहे. जेसीबी, डम्पर प्लेसर, टीपर ट्रक, सक्शन व्हॅन, नाला व्हॅन, ट्रॅक्टर, काॅम्पॅक्टर आदी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.