सांगली : कायदेशीर विभागाचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासह बड्या ३० थकबाकीदार संस्थांना कारवाईच्या नोटिसा सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमार्फत बजावण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा बॅँकेच्या हालचालींना गती आली आहे. थकबाकीदारांच्या यादीत ६० संस्थांचा समावेश असून, यातील बड्या ३० थकबाकीदारांकडे एकूण २०५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखानाही या ३० थकबाकीदारांमध्ये आहे. या थकबाकीदार संस्थांकडील थकित कर्जवसुलीसाठी बँकेने तयारी सुरू केली आहे. बॅँक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बड्या थकबाकीदारांकडील वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सध्या बँकेची वसुली गतवर्षाच्या तुलनेत अधिक आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ७.२७ टक्के अधिक कर्जवसुली आहे. चालू मागणीप्रमाणे अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे ८२९ कोटी रुपये येणे अपेक्षित होते. त्यापैकी ६४५ कोटी १२ लाख रुपये वसूल झाले आहेत.वर्षभरात बड्या संस्थांकडील थकबाकी वसूल झाली, तर बॅँकेचा आर्थिक आलेख अधिक बळकट होणार आहे. (प्रतिनिधी)
कायदेशीर प्रक्रियेनंतर ‘वसंतदादा’ला नोटीस
By admin | Updated: July 8, 2015 23:52 IST